तालुक्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

बीड

पिंपळनेर परिसरातील तरुण रस्त्यावर, कडक उन्हात दोन तास आंदोलन

बीड तालुक्यातील पिंपळनेर शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील शेकडो तरुण मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरत घाटसावळी येथे रास्तारोको आंदोलन केले. तीव्र उन्हाच्या कडाक्यात तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर नायब तहसीलदारांना निवेदन देवून आंदोलन स्थगीत करण्यात आले. यावेळी पोलीसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आणि नंतर सोडून देण्यात आले.

पिंपळनेर तालुका निर्मितीचा प्रश्न गत ४५ वर्षापासून रखडलेला आहे. गत अनेक वर्षापासून या भागातील तरुण विविध प्रकारचे आंदोलन करीत असताना शासनकर्ते मात्र पिंपळनेर तालुका निर्मितीच्या विषयाला बगल देत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकात संतापाची भावना असून अंबाजोगाई जिल्हानिर्मितीच्या पार्श्वभुमीवर पिंपळनेर तालुका निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गत दोन महिन्यापासून पिंपळनेर भागातील नागरिक विविध प्रकारचे आंदोलन करीत असून दि. २ एप्रील रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उपोषण केले होते. त्यानंतर मंगळवार (दि. १७) रोजी बीड – परळी महामार्गावरील घाटसावळी येथे पिंपळनेर परिसरातील तरुणांनी सकाळी रास्तारोको आंदोलनास सुरुवात केली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करुन प्रशासनाचे लक्ष वेधन्यात आले. उन्हाची तीव्रता वाढत असतानाही शेकडो तरुणांनी यावेळी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करुन पिंपळनेर शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली. तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा या महामार्गावर लागल्या होत्या.

अखेर नायब तहसीलदार यांनी पिंपळनेर परिसरातील नागरिकांचे निवेदन स्वीकारुन आंदोलन स्थगीत करण्याची विनंती केली. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपळनेर पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात माजी मंत्री बदामराव पंडित, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत पेंढारे, सुनिल पाटील, परमेश्वर सातपुते, मनोज पाटील, सुंदर चव्हाण, गणपत डोईफोडे, बिभीषण घुमरे, चंद्रकांत फड, अरुण लांडे, नानाभाऊ जाधव, राजाभाऊ गवळी, प्रफुल्ल चरखा, भारत जवळकर, अरुण भोंगाणे, नितीन सिरसट, बाळासाहेब नाकटीळक, रामेश्वर मुंडे, सुधिर शिंदे, दुष्यंत डोंगरे, माऊली इतापे सह पिंपळनेर, नाथापूर, ताडसोन्ना, अंबेसावळी, वलीपूर, जवळा, ईट, गुंधा, वडगाव, सांडवरण, पिंपळादेवी, परभणी, केसापुरी, वडगाव, काळेगाव, अंबेसावळी सह आदी गावातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 thought on “तालुक्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

  1. पिंपळनेर तालुका व्हावा
    सोन्ना खोटा ( कुंडलिका प्रकल्पातून ) पिंपळनेर, नाळवंडी सर्कल शेतीसाठी पाणी मिळावे
    पिंपळनेर येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय व्हावे
    ( R H )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *