प्रेस लाईनचा ‘रवी’ मावळला!

बीड

प्रेस लाईनचा शुकशुकाट, जिल्हा रूग्णालयातील पीएम रूम समोरील स्मशान शांतता पाहून आलोय… कायम मदतीला धावून येणार्‍या मित्रासाठी शेवटचे चार शब्द लिहायचे आहेत… मनाचं आभाळ भरून आलय… पण किती वेळापासून किबोर्डवर नुसती बोटं ठेवली आहेत… श्रध्दांजलीचे चार शब्द लिहायचं धाडस होत नाही… रवी दोडके नावाचा प्रेस लाईनला उजेड देणारा दिवा अचानक विझला आहे… सुर्य उगवण्यापुर्वीच रवी नावाचा सुर्य मावळलाय, यावर विश्‍वासच बसत नाही… एखादं वाईट स्वप्न पडल्याचा भास होतोय… पण दुर्दैवाने ते स्वप्न नाही… रवी कायमचा मावळला आहे… 2012 साली दैनिक लोकनेता सुरू करण्याचा निर्णय घेतला… फॅक्स मशीन, स्कॅनर, संगणक, टेबल, खुर्च्या अशा एक एक वस्तू गोळा करून कार्यालय उभे करत होतो… सार्‍या वस्तू गोळा केल्यानंतर शेवटी इन्व्हर्रटरच्या बॅटरीशिवाय ऑफिस सुरू होणार नव्हते… उभे केलेले पैसे संपले होते… पुण्यनगरी कार्यालयासमोरच रवी दोडके यांचे “माऊली कृपा इलेक्टरीकल्स & इलेक्ट्रॉनिक्स” चे दुकान असल्याने त्यांच्याशी जुणीच ओळख होती… त्यांची भेट घेतली. इन्व्हर्टर खरेदी करायचे आहे पण जवळ पैसे नाहीत… दिवाळीत पैसे देईल असे सांगीतले अन् संध्याकाळी परत येऊन भेटतो म्हणत पुढच्या कामासाठी रवाना झालो… अर्ध्या एक तासाने ऑफिसला आलो तर इन्व्हर्टरची बॅटरी बसवण्याचे काम सुरू होते… संध्याकाळपर्यंत वायरींग, लाईटचे बोर्ड बसवून रवी यांनी एका दिवसात सारी सिस्टीम सुरू करून दिली… पैसे देण्याचा मी दिवाळीचा वायदा केला मात्र दिवाळी गेली, पाडवा गेला… अक्षयतृतीयेला पैसे दिले… उधारीचे पैसे द्यायला एक वर्षाचा कालावधी लागला मात्र पैशाचे काय झाले? असे एकदाही रवी दोडके यांनी विचारले नाही…
ज्या ज्या वेळी त्यांच्या दुकानात गेलो त्या त्या वेळी चहा पाजल्याशिवाय परत येऊ दिले नाही… या नंतर एकदोन वेळा त्यांच्याकडे उधारीवर खरेदी केली… वेळेत पैसे देणे कधीच शक्य झाले नाही… मागच्या दिवाळीला शेवटची उधारी त्यांच्या भावाकडे दिली…पैसे दिल्याचे रवी दोडेकेंना फोन करून सांगीतले… तिकडून नेहमीप्रमाणे अतिषय नम्रपणे “बांधकाम सुरू असल्यामुळे खूप अडचणीत होतो… फार टायमाला पैसे दिल्याचे” ते म्हणाले… “थांबा, जावू नका… मी दुकानावर येत आहे, चहा घेऊन जा” असा आग्रह केला…
रवी दोडके यांच्या विषयी हा माझा व्यक्तीक अनुभव आहे… माझ्या प्रमाणेच प्रेस लाईनचे सर्व वर्तमानपत्र आणि विविध कार्यालय, दुकांनदारांना रवी दोडके यांनी मदत केली आहे… रवी यांच्या स्नेहामुळे प्रेस लाईनची लाईट कधी विझलीच नाही… कारण पाच मिनिटात रवी यांना हक्काने बोलावून दुरूस्ती केली जायची… प्रेस लाईनचा हा प्रकाश देणारा दिवा… असा अचानक विझून जाईल असे कोणालाच वाटले नव्हते… निर्व्यसनी, तंबाखू- बडीशेपही न खाणारा रवी… घरी लग्न समारंभ असल्याने काल रात्री 1 वाजेपर्यंत लग्न कार्याची कामे करत होता… रात्री उशीरा दिड वाजता घरी पोचून अंथरूणावर आडवा झाला तो कामचाच… सकाळपासून मोबाईलचे नेट सुरू केले नव्हते… सकाळी 11 वाजता सुरू केले अन् दिपक सर्वज्ञ, प्रशांत सुलाखे यांची फेसबुकवरील रवी गेल्याची पोस्ट पाहीली… धक्काच बसला… विश्‍वास बसत नव्हता… गाडीला किक मारली आणि प्रेस लाईनला पोचलो… दैनिक लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, सामना, लोकप्रश्‍न, चंपावतीपत्र, रणझुंजार, क्लिक टू न्यूज या माध्यमांच्या कार्यालयामुळे कायम गजबजलेल्या प्रेस लाईनच्या परिसरातील स्मशान शांतता पसरली होती… सकाळी 9 वाजता उघडणार्‍या कार्यालयांचे शटर 12 वाजले तरी बंद होते… संपादक दिलिप खिस्ती सर भेटले… रवी गेल्याची माहीती मिळाल्यापासून मन सुन्न झाले असल्याचे ते म्हणाले… थोडा वेळ तिथे थांबून पुण्यनगरी कार्यालयात गेलो… संदीप लवांडे यांनी आमचे एटीएम हरवल्याचे सांगीतले. अडीअडचणीच्या प्रसंगात इकडून दोन बोट दाखवले की तिकडून रवी दोन हजार रूपये घेऊन यायचे… रवी म्हणजे आमचे एटीएम होते… अशा या दिलदार, प्रेमळ, निस्वार्थी आणि कायम मदतीला धावून येणार्‍या मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छानसा लेख लिहायचा होता… अनेकवेळा केलेल्या मदतीची शब्दांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करायची होती… लेख लिहायचा राहून गेला… आज शब्दांची श्रध्दांजली अर्पण करावी लागत आहे… क्रूर नियतीपुढे आपण सारे किती हतबल आणि दुबळे आहोत…!
दैनिक लोकनेता परिवाराचे सदस्य रवी दोडके यांना भावपुर्ण श्रध्दांजली…

-बालाजी तोडे, Beed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *